प्रेम, नातेसंबंध आणि लॉकडाउन..!


प्रेम, नातेसंबंध आणि लॉकडाऊन...


प्रेम हा सर्वांसाठी जिव्हाळ्याचा आणि जवळचा विषय पण तितकाच गहन विषय. प्रेम म्हणजे काय? तर शास्त्रज्ञ, शास्त्रीयदृष्ट्या प्रेम म्हणजे एक केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र म्हणतात. त्यांच्या मते प्रेम म्हणजे Dopamine, Norepinephrine आणि serotonin ह्याचं पाझरण.  हि रुक्ष व्याख्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला काही पचनी पडत नाही. माझ्या मते प्रेम म्हणजे "पाणी". हा! प्रेम म्हणजे साध पाणी...बस्स... त्या साठी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. एक प्रेमी युगुल असत. एकेदिवशी प्रेयसी प्रियकराला एक प्रश्न विचारते. 

प्रेयसी: सांग ना जिवलगा तू माझ्यावर खरोखरच प्रेम करतोस का?

प्रियकर: करतो म्हणजे काय! अलबत! कोई शक? अगदी जीवनाच्या अंतापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करतो प्रिये!

प्रेयसी: मग सांग बघू तु माझ्यावर का प्रेम करतोस?

प्रियकर: हे हे..! हे सांगण कठीण आहे. मी नाही सांगू शकत.

प्रेयसी: मग तुझ माझ्यावर प्रेमच नाही मुळी! (प्रेयसी रुसून बसते)

प्रियकर: कशावरून! कशावरून?

प्रेयसी: माझी मैत्रिण पारुल, तिचा प्रियकर परेश तिला रोज शेकड्याने कारण देतो तिला. आणि माझी मैत्रिण सुलू, तिचा प्रियकर सुनिल तिला हज्जार कारण देतो तिला. मग तू मला निदान पाच कारण देवू शकत नाहीस?

प्रियकर: बर लाडके असं रुसून नाही बसायचं. तू मला आवडतेस कारण तू खूप सुंदर आहेस, तू मला आवडतेस कारण तुझा आवाज खूप गोड आहे, तू मला आवडतेस कारण तुझ हास्य एकदम मोहक आहे, तू मला आवडतेस कारण तुझे डोळे खूप बोलके आहेत, तू मला खूप आवडतेस कारण तुझी चाल खूप डौलदार आहे. अशी गडे तू मला खूप खूप आवडतेस.

प्रेयसीच समाधान होत आणि असेच गुलाबी दिवस जात असतात. अचानक एके दिवशी त्या प्रेयसीचा अपघात होतो. तिचा चेहरा छिन्न विच्छिन्न होतो, तिला अनेक ठिकाणी फ्रेक्चर होते. ती कोमात जाते. अश्या परिस्थितीत तिचा प्रियकर तिला रुग्णालयात भेटावयास जातो. तिथे त्याची प्रेयसी निश्चिंत व अबोल बेडवर पहूडलेली असते. तो तिच्या बेडखाली एक चिठ्ठी ठेवतो. त्यात लिहिले असते कि, "प्रिये तुझा चेहेरा आता विद्रूप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रेम करीत नाही, तुझा आवाज मी आता ऐकू शकणार नाही म्हणून मी तुझ्यावर प्रेम करीत नाही, तू आता हसू शकत नाही म्हणून मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही, तू आत्ता डोळे मिटून झोपली आहेस आणि माहित नाही ते तू कधी उघडणार म्हणून मी तुझ्यावर प्रेम करु शकत नाही, तुझी चाल मला आवडत असे पण आत्ता तू साधी उठून बसण्यास योग्य नाहीस म्हणून मी तुझ्यावर प्रेम करु शकत नाही. तरी पण तू मला अजूनही हवी आहेस. अगदी जशी आहेस तशी...प्रिये खरोखरच प्रेमाला कारण असतात का?...?

तर मंडळी सांगा तर मला प्रेमाची व्याख्या करता येण शक्य आहे का? कारण प्रेमाची व्याख्या करायला आधी प्रेमाची कारण शोधन गरजेच आहे. त्यामुळे प्रेमाची व्याख्या कारण अशक्य आहे. कारण प्रेम हे सागराप्रमाणे अथांग आहे. ती एक भावना आहे असं फार तर आपण म्हणू शकतो. आणि त्या भावनेतून नात निर्माण करण्याची ओढ आहे. आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक तरी नात जे मनाच्या खोल गाभाऱ्यात छुप्या स्वरुपात किंवा खुल्या स्वरूपात नात्यांच्याही पलीकडे असं नात असतच असत. लोकांनी किंवा समाजाने भले कितीही नाव ठेवली (प्रियकर-प्रेयसी, लैला-मजनू, भक्त, नैतिक, अनैतिक इ. इ.) असं नात जे निनावी असत, नियमांच्या पलीकडे असत, आशा-अपेक्षांच्या पलीकडे असत, इच्छा-आकांशाच्या पलीकडे असत, बंधनाच्या पलीकडे असत, हव्यासाच्या पलीकडे असत, वय, जात-पात, धर्म-पंथ, वर्ण-वंश, गरीब-श्रीमंत, ह्या सर्वांच्या पलीकडे असत, जे मनात कुठेतरी जपून ठेवलेल असत. आयुष्यभर कधीही न विसरता येणार, दुख:द प्रसंगी हळुवार फुंकर घालणार आणि अधून मधून स्वप्नात घुलणार. असं नात प्रत्येकाच्या हृदयात कुठेतरी कोपऱ्यात जपून ठेवलेलं असतच असत. आणि म्हणूनच "दुनियादारी", "टाईमपास" किंवा "ती सध्या काय करतेय" ह्यासारखे सिनिमे हे सुपरहिट होतात. आणि असे हजारो सिनेमे येऊन गेले पण कुठल्याही सिनेमात प्रेमाची व्याख्या केलेली आढळत नाही. कारण ते शक्य नाही. 

प्रेमाची व्याख्या जरी करता शक्य नाही तरी त्याची तुलना आपण करू शकतो. मी वैयक्तिक दृष्ट्या प्रेमाची तुलना पाण्याशी करेन. जस पाण्याला स्वत:चा आकार, गंध, रंग नसतो तसच प्रेमाला स्वत:च ठराविक रूप, लक्षण अथवा रंग नसतो. पाणी जस ज्याच्यात पडेल तसा आकार, ज्याच्यात विरघळेल त्याची चव आणि ज्याच्यात मिसळेल त्याचा रंग घेत अगदी तस्सच प्रेमाच आहे. कुणाच प्रेम हे possessive असत, तर कुणाच प्रेम हे त्यागी असत, तर कुणाच प्रेम हे अति-काळजी करणार चिंतीत असत, तर कुणाच प्रेम हे आक्रस्ताळी असत, तर कुणाच प्रेम हे हळुवार फुंकर घालणार असत, कुणाच प्रेम जीव देणार असत, तर कुणाच प्रेम हे जीव घेणार पण असत. अश्या व्यक्ती तितक्या प्रकृतीच्या स्वभावाने प्रेम हे अगणित व अनेक प्रकारच असत. म्हणूनच मी त्याला पाण्यासारख असत असं म्हटलं. आणि ते पाण्या सारख न थांबवता येणार असत. जस पाण्याला मोठ मोठाले पहाड किंवा पर्वत थोपवू शकत नाही अगदी तस्सच प्रेमाला पण कोणी थोपवू शकत नाही. (इथे प्रेम म्हणजे लग्न नव्हे तर एक भावना गृहीत धरली आहे.) जगातील कुठलीही शक्ती हि भावना रोखू शकत नाही.

तर मंडळी सध्या लॉकडाऊन चालू आहे आणि जर इतिहास उघडून बघितला तर आपण पाहिलं आहे कि जिथे प्रेमाने राजा-रंक, श्रीमंत-गरीब, वर्ण-वंश, जात-पात, धर्म-पंथ, वय-उंची, रंग-रूप, दोन देशातील अन्तर अश्या अनेक भिंती तोडून भुईसपाट केल्या तिकडे लॉकडाऊन क्या चीज ही दोस्तो..? प्रेमाने लॉकडाऊन पण तोडला आहे.

तर मंडळी आंध्रप्रदेश मधील घटना आहे. तिकडील एक युवती घरातील लोकांचा विरोध होता म्हणून घर सोडून पळाली. आणि तिने एकटीने तब्बल ६०कि.मि.चा प्रवास पायी करत प्रियकराच्या घरी गेली व थोडक्यात लग्न केले. तुम्ही विचार करा एकटी तरुण महिला खाण्या पिण्याची परवा न करता, स्वत:च्या तब्येतीची परवा न करता, स्वत:च्या सुरक्षेची परवा न करता रात्र-दिवस चालत चालत एकाच दृढ निश्चयाने  प्रियकराकडे गेली, हि खूप मोठी गोष्ट आहे. दुसर उदाहरण डॉ. विवेक मेहता हा मनुष्य बिकानेरला त्याच्या चि.सौ.का. पूजा चोप्रा हिला भेटायला गेला असताना लॉकडाऊन घोषित झाला. तर त्याने क्षणाचाही विलंब लावता तिथल्या तिथे तिच्या बरोबर लग्न करून टाकले. अमेरिकेतील एक video खूप वायरल झाली आहे. त्यात दोन प्रेमी जीवांची गच्चीवर ओळख होते. अगदी "मेरे सामने वाली गच्चीमे, एक चांदसा तुकडा रहता है" अगदी त्याच प्रमाणे. एकमेकांचा फोन नंबर इशाऱ्याने exchange करतात. मग texting होत आणि प्रेम जुळत. मग त्या प्रेयसीला भेटायला हा प्रियकर एका मोठाल्या प्लास्टिकच्या बबल मध्ये  जाऊन तिला भेटून येतो. युरोपमध्ये अनेक भरकटलेले प्रवासी म्हणजे काहीतरी कामानिमित्त निघालेले प्रवासी अचानक लॉकडाऊन घोषित झाल्या मुळे अनोळखी लोकांच्या घरी आसऱ्याकरिता गेलेत आणि ते तिथेच लग्न करून बसलेत. मुख्य म्हणजे तिथे मेरेज-कोर्ट चालू आहेत. 

भारतात परिस्थिती वेगळी आहे कारण इथे मेरेज कोर्ट चालू नाहीत. भारतात मी इथे काही जोडप्याची मुलाखत घेवून निष्कर्ष काढला आहे तो खाली मांडला आहे. इथे मी त्याचं चार प्रकारात वर्गीकरण केल आहे:-

१. ज्यांची लग्न ठरली आहेत पण लॉकडाऊनमुळे झाली नाही आहेत:-

अश्या लोकांना सोशल मिडीयाचा खूप आधार वाटत आहे. कारण त्या मुळे निदान एकमेकांच दर्शन तरी घेण शक्य झालेलं आहे. एकमेकांची खुशाली विचारण शक्य झालं आहे. परंतु एकमेकाशी रोमांटिक संवाद साधण जवळ जवळ अशक्य झालं आहे. त्याला दोन कारण आहेत. एक म्हणजे भारतीय कुटुंबपद्धतीत प्रायव्हसी अशक्य आहे. दुसर म्हणजे करोनाच सावट आहे. त्यामुळे हसत खेळत बोलता येतच नाही. दुसर म्हणजे एव्हढा वेळ नजरेपासून दूर राहिल्या मुळे लॉकडाऊन नंतर समोरची व्यक्ती बदललेली असेल का हि शंका पण कुणकुणते.

२. लपूनछपून प्रेम करणारी जोडपी:- अशी जोडपी आहेत ज्यांची प्रेम प्रकरण चालू आहेत पण घरी कुणाला माहित नाही. ह्या लोकांची खूप पंचाईत झाली आहे. हि लोक Video Chat करू शकत नाही कारण ह्यांचे संबध घरात कुणाला माहित नाही आहेत. त्यामुळे हि लोक फक्त Texting वर अवलंबून आहेत. ह्यांना पण आपला जोडीदार बदलला जाण्याची किंवा सोडून जाण्याची असुरक्षितता वाटत आहे. दुसरी गोष्ट आपल्या संभाषणाचा पुरावा राहिल्या मुळे ब्लेकमेलिंगची भीती वाटत आहे.

३. प्रेमासाठी आसुसलेले प्रेमवीर:- हे लोक ते आहेत कि ज्याचं अजून कुणाबरोबर प्रेम प्रकरण जुळल नाही. अश्या लोकांसाठी खुश खबर आहे की Tinder, Bumbble, Cupid etc. डेटिंग साईटने worldwide location platform फुकटात चालू केला आहे. म्हणजे "हे विश्वाची माझे घर, सर्व मैत्रिणीसाठी उघडे माझे दार" अशी परिस्थिती आहे. त्यामुळे निवडीचा होरायझन वाढला आहे. भारतातील मुला-मुलींना परदेशातील मुला-मुलींबरोबर मैत्री करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्या मुळे प्रगत देशातील मुला-मुलींबरोबर लग्न करून तिथे स्थाईक होण्याची संधी पण वाढली आहे.

४. पती-पत्नी मधील प्रेम:- नेहमीच बाहेर असणारे पतीराज किंवा काही कुटुंबातील दोघही बाहेर असणारे आता घरातच लॉक झाल्यामुळे एकमेकांतील संवाद वाढू लागला आहे. एकमेकांना नव्याने जाणून घेऊ लागले आहेत. एकमेकांच्या कार्यात रस घेवू लागले आहेत. पतीराज पत्नीला घरकामात मदत करू लागले आहेत. त्यामुळे पतिराजांना पत्नीच्या अडचणी समजू लागल्या आहेत. दुसरीकडे पत्नीला कामवाली बाईला कायमची काढून टाकण्याची स्वप्न पडू लागली आहेत. दुसऱ्या बाजूला मुलं कायम घरी असल्याने रोमँटिक सेक्स गदा आली आहे आणि त्यामुळे आलेल्या नैराश्याने mechanical sex चे प्रमाण वाढले आहे. काही जोडपी करोनाचा भीतीने सेक्स टाळत आहेत पण कोंडोमची विक्री वाढली आहे, त्यावरून सेक्स टाळणारी जोडपी कमी आहेत असा निष्कर्ष काढू शकतो. काही ठिकाणी तर पती पत्नीमधील भांडणं वाढू लागली आहेत. माझ्या दृष्टीने हा खरा  कळीचा मुद्दा आहे आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा दोन भिन्न वातावरणातून वाढलेल्या व्यक्ती चोवीस तास एकत्र राहू लागतात तेव्हा सुरुवातीचे दिवस खूप मौज मजेचे जातात. अनेकांनी तर घरात काय काय गोड धोड बनवले ह्याचे फोटो पण Whatsappवर टाकले. पण जसे जसे दिवस जातात तस तसे एकमेकांच्या सहवासाचा उबग येवू लागतो. एकमेकांमधील दोष दिसू लागतात. त्या दोषांवर लक्ष्य केंद्रित होते व तेच दोष एकमेकांवर मारले जातात. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात. अगदी Big-Bossसारख. आणि आदळ आपट चालू होते. मला वाटत हीच खऱ्या परीक्षेची घडी आहे. एकमेकांमधील आकर्षण टिकवून ठेवायला पाहिजे. त्या साठी थोडा समजुतदारपणा आपसुख दाखवायला पाहिजे. तसेच एकमेकांनी न जोपासलेले छंद जोपासायला सुरुवात केली पाहिजे. एकमेकांच्या छंद व कला आविष्काराची खोटी खोटी का होईना स्तुती करायला पाहिजे. एकमेकांनी बैठे खेळ जसे पत्ते, लुडो, साप-शिडी, बुद्धी-बळ, व्यापार इ. इ. खेळले पाहिजेत. मला वाटत लॉकडाऊन हि एक परिपूर्ण Compatibility Test आहे. ज्या जोडीदारांनी लॉकडाऊनची परीक्षा पास केली ते त्यांच्या जीवनातील कुठलीही परीक्षा सहज पास करू शकतात. आणि म्हणूनच माझ्या सर्व पाश्चिमात्य मित्र-मैत्रीणीना आणि पाश्चिमात्य विचाराच्या भारतीय मित्र-मैत्रिणीना एकाच सांगणे आहे की एकमेकांच्या compatibility साठी आयुष्याची अनमोल पाच ते दहा वर्षे फुकट घालविण्यापेक्षा ३०-४५ दिवसाची लॉकडाऊन टेस्ट घ्या आणि वेळ वाचवा आणि जीवनाचा आनंद लुटा. शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog

"Man is not what job he does, he is what apart."

J1 झालं का?